आणीबाणीचा बिर्ला यांनी दिलेला संदर्भ राजकीय; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:20 AM2024-06-28T09:20:02+5:302024-06-28T09:20:15+5:30
देशात १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात दिलेला संदर्भ राजकीय स्वरूपाचा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात दिलेला संदर्भ राजकीय स्वरूपाचा होता. तो उल्लेख टाळता आला असता, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी बिर्ला यांची संसद भवनात भेट घेऊन त्यांना सांगितले व आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्याची ओम बिर्ला यांनी घोषणा केली. त्यानंतर गांधी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
आणीबाणीचा विषय संसदेत उपस्थित झाला होता. त्याबद्दल या भेटीत चर्चा झाली का, या प्रश्नावर वेणुगोपाल म्हणाले की, संसदेच्या कामकाजासंदर्भातील अनेक गोष्टींवर आम्ही लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. त्यात आणीबाणीचाही मुद्दा होता. लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी एक ठराव सभागृहात मांडला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली. हा राज्यघटनेवर हल्ला होता. त्याचा आम्ही निषेध करतो, असे या ठरावात म्हटले होते.
काय म्हटले ठरावात?
केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले, न्याययंत्रणेच्या स्वायत्ततेवर गदा आणली असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात मांडलेल्या ठरावात म्हटले होते.