ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24- सरकारकडून पासपोर्ट बनवायची प्रक्रिया आधीच्या तुलनेत थो़डी सोपी करण्यात आली आहे. पासपोर्ट तयार करण्यासाठी आता एका कागदपत्राची कमी पुर्तता करावी लागणार आहे. पासपोर्ट बनविण्यासाठी आता जन्मतारखेचा दाखला सादर करायची सक्ती नसेल. सरकारकडून संसदेत या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जन्मतारखेच्या दाखल्याची जागी आता पॅन कार्ड किंवा आधार कार्डच्या माध्यमातून व्यक्तीचं वय आणि जन्म तारीख तपासली जाणार आहे. पासपोर्ट नियम 1980 नुसार 26 जानेवारी 1989 नंतर जन्म झालेल्या व्यक्तींना आधी आवश्यक अशा सगळ्या बाबींची पूर्तता करावी लागत होती. पण आता जन्मतारखेसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळख पत्र किंवा एलआयसी पॉलिसीचा बॉन्ड पुरावा म्हणून पासपोर्टसाठी वापरू शकतात.
आणखी वाचा
रेल्वे स्थानकात मिळणार स्वस्तामध्ये शुद्ध पाणी
निवृत्त होताना समाधान!
याशिवाय सरकारी कर्मचारी त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड याचाही वापर पासपोर्ट तयार करायला करू शकतात. संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के सिंह यांनी ही माहिती दिली आहे. देशातील लाखो लोकांना सोप्या पद्धतीने पासपोर्ट उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचं सिंह यांनी सांगितलं आहे. तसंच 60 वर्षापेक्षा कमी आणि 8 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांना पासपोर्टसाठी आकारल्या जाणाऱ्या फी वर 10 टक्के सूट मिळणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणारे अर्जदार आई-वडिलांपैकी एकाचं नाव अर्जात लिहू शकतात.
पासपोर्ट तयार करण्यासाठी आधी एकुण 15 कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती. पण आता एकुण 9 कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. 15 अधिकृत कागदपत्रांऐवजी 9 अधिकृत कागदपत्र स्वीकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही 9 कागदपत्रं एका कागदावर प्रिंट करून तसंच सेल्फ अटेस्डेंड करून सादर करायची आहेत. यापुढे कागदपत्रावर कार्यकारी दंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीची गरज लागणार नाही. तसंच लग्न झालेल्या व्यक्तीला पासपोर्टसाठी अर्ज करताना मॅरेज सर्टिफिकेट सादर करायची आवश्यकता नाही. घटस्फोटीत व्यक्तीला पती किंवा पत्नीचं नाव लिहायची गरज नाही. पासपोर्ट संबंधातील हे सगळे नियम डिसेंबर 2016 पासून वापरात आहेत.