नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा जन्मदिवस आहे. 17 सप्टेंबर 1950 साली नरेंद्र यांचा जन्म झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचले असून अहमदाबाद येथेच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. आरएसएसचा सर्वसामान्य कार्यकर्ते ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास थक्क करणार आहे. संन्याशी बनून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून मोदींनी कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी, मोदींनी घरंही सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भूतकाळातील काही महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकुया. जेव्हा नरेंद्र मोदींना दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी फोन करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं निमंत्रण दिलं होतं. काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव सिंधिया यांचा अपघात झाला होता. सन 2001 मध्ये माधवराव सिंधिया यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी दिल्लीतच येत होते. माधवराव सिंधीया यांच्यासमवेत एका पत्रकाराचाही मृत्यू या विमान अपघातात झाला होता. त्यामुळे एकीकडे माधवराव सिंधिया यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचण्यासाठी दिग्गजांनी गर्दी केली होती. तर, दुसरीकडे पत्रकाराच्या अंत्यसंस्कारासाठी काही तुरळकच गर्दी झाली होती. गोपाल असे या मृत्युमुखी पडलेल्या पत्रकाराचे नाव होते. सिंधीया यांच्या अंत्यसंस्काराला नेते पोहोचल्यामुळे गोपाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमी गर्दी असल्याचं समजताच मोदींना वाईट वाटले. त्यावेळी मोदी, गोपाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले.
नरेंद्र मोदी जेव्हा पत्रकार गोपाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत उपस्थित होते. त्याचवेळी, अटलबिहारी वाजयेपींचा मोदींना फोन आला आणि त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याच्या सूचना देण्यात आल्या. अटबिहारींनी विचारले की, कहाँ हो?. त्यावर मोदींनी मी स्मशानभूमीत असल्याचे सांगितले. अटलबिहारींनीही मग जास्तीचे बोलणे टाळले आणि मोदींनी घडलेला प्रसंग त्यांच्या कानावर घातला. त्या रात्री मोदींनी अटलबिहारी यांची भेट घेतली. स्मशानभूमीत असताना मोदींना आलेला तो कॉल त्यांच्यासाठी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेऊन आला होता.