अशोक पाटील-- इस्लामपूर --येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसर सुशोभिकरण्याच्या उद्घाटन समारंभास सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास काही नेते वेळेत आले, तर काहींना उशीर झाला. त्यामुळे एकूणच कार्यक्रमात निरुत्साह जाणवत होता. येडेमच्छिंद येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर होत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर भाषणबाजी करुन काँग्रेस नेते निघून गेले. एकूणच उपस्थित नेत्यांकडे सत्ता नसल्याने त्यांच्यात अस्थिरता असल्याचे जाणवत होते.इस्लामपूर येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण केले. याच्या उद्घाटनासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांना पाचारण केले होते. परंतु काही कारणाने ते येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे युवा नेते, सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या नेत्यांमध्ये कसलाही ताळमेळ नव्हता. सायंकाळी ४.३0 वाजता असणारा कार्यक्रम दोन तास उशिरा सुरु झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार जयंत पाटील यांनीच कार्यक्रमास येण्यास उशीर केला. त्यामुळे वेळेत आलेल्या काँग्रेसच्या मोहनराव कदम, राहुल महाडिक यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. उद्घाटनानंतर भाषणे सुरु झाल्यानंतर जयंत पाटील यांचे आगमन झाले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याहस्ते फीत कापून दुसऱ्यांदा उद्घाटनाचा फार्स करण्यात आला.सर्जेराव यादव यांनी चांगल्या भावनेने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या, शेतकरी संघटनेच्या नेत्यांना हे रुचले नसल्यानेच त्यांनी, तातडीची कामे असल्याचे कारण सांगून कार्यक्रमातून काढता पाय घेणे पसंत केले.सध्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांत कमालीची अस्थिरता आहे. जयंत पाटील यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत असली तरी, राज्यात पक्षाला स्थान नाही. त्यामुळे सत्ता नाही याची मोठी रुखरुख त्यांना लागली आहे. काँग्रेसला दिवस चांगले असले तरी, काही मतदार संघात काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मुंबईत ठाण मांडून असून, सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते शरीराने एकत्र असले तरी, ते मनाने एकत्र नव्हते. उपस्थित नेत्यांमधील एकाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात कमालीची अस्थिरता असल्याचे चित्र दिसत होते.राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर होत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर भाषणबाजी करुन काँग्रेस नेते निघून गेले. एकूणच उपस्थित नेत्यांकडे सत्ता नसल्याने त्यांच्यात अस्थिरता असल्याचे जाणवत होते. कार्यक्रम दोन तास उशिरा सुरु झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार जयंत पाटील यांनीच कार्यक्रमास येण्यास उशीर केला.
क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत नेत्यांत अस्थिरता
By admin | Published: December 05, 2015 12:39 AM