कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. आज मतदान सुरु झाले आहे. वेगवेगळ्या संस्थांनी वर्तविलेले अंदाज काँग्रेसला बहुमत मिळण्याचे आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशीच कर्नाटकच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. यात भाजपाने कर्नाटकसाठी काय केले ते नमूद केले आहे. असे असताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजरंग दलावर काँग्रेसच्या आश्वासनावर वक्तव्य केले आहे.
कर्नाटकात २२४ जागांवर 2614 उमेदवार उभे आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत 8.26% मतदान झाले होते. सेलिब्रिटी, नेते देखील मतदानासाठी आले होते. अर्थमंत्री निर्मला या देखील बंगळुरुच्या विजयनरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आम्ही नेहमी हनुमानाची पुजा करतो. हनुमान चालिसा वाचतो. काँग्रेस निवडणुकीवेळीच हनुमानाची भक्त होऊन जाते. कर्नाटकात हनुमानाचे जन्मस्थळ आहे. त्याच राज्यात बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा करत आहेत. मूर्खपणाचे यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात कोणी किती सभा घेतल्या...राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे. यावेळी भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या बड्या नेत्यांनी 450 हून अधिक सभा घेतल्या. तसेच 100 हून अधिक रोड शो केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटकात राहिले. तर राहुल, प्रियांका आणि सोनिया यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या.
निवडणूक प्रचारात काँग्रेसने भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीवर लक्ष केंद्रित केले. तर भाजपने बजरंगबली, बजरंग दल, दहशतवाद हा मुद्दा बनवला. मोदींनी 19 पैकी 12 सभांमध्ये हनुमानाचा उल्लेख केला.