नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या ओएसडीला लाच घेताना पकडले आहे. त्यावरून भाजपनेते आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रवेश वर्मा यांनी सिसोदिया यांच्यावर निशाना साधला आहे. लाचेच्या पैशातूनच शाहीन बागेतील आंदोलकांना बिर्याणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सिसोदिया यांचा ओएसडी नाममात्र आहे. मनिष सिसोदिया हेच त्याचे खरे मालक आहेत. लाचेचे पैसे सिसोदिया यांच्या खिशात जात असून त्याच पैशातून शाहीन बागेत बिर्याणी दाखल होत असल्याचा आरोप प्रवेश वर्मा यांनी केला आहे.
सिसोदिया यांचे ओएसडी गोपाल कृष्ण माधव यांच्या अटकेनंतरच वर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. गोपाल कृष्ण यांना सीबीआयने जीएसटी संदर्भातील प्रकरणात 2 लाखांची लाच घेताना अटक केले आहे. या प्रकरणात सिसोदिया यांची काहीही भूमिका असेल असं वाटत नाही. आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रवेश वर्मा वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच काश्मीरमध्ये कश्मीरी पंडितांसोबत जे झाले ते इथंही घाडू शकते, असा इशारा गोपाल कृष्ण यांनी दिला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती.