श्रीनगर : कडाक्याच्या थंडीतही जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचे मार्गक्रमण शुक्रवारी चालू राहिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच रेनकोट घातला, परंतु पाऊस थांबताच तो काढूनही टाकला. शुक्रवारच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेतेही यात्रेत सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हातली मोर येथून पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू केली.
खऱ्या मुद्द्यांवर आवाज उठविणारा नेता : राऊत
संजय राऊत म्हणाले, “मी माझ्या पक्षाच्या वतीने यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे आणि मी राहुल यांना खऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो. ते नेते आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत. जनताच ठरवेल त्यांचा नेता कोण असेल. दरम्यान, फारुक अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद जिवंत असून, पाकिस्तानशी चर्चा करूनच त्याचा नायनाट करता येईल, असे मत व्यक्त केले.