बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : चिथावणीखोर व्हिडीओ जारी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नूह हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगीला फरिदाबाद येथून हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे.
बजरंगीव्यतिरिक्त २० जणांवर दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक बिट्टू बजरंगी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नूहमध्ये हिंसाचार उसळला होता.
बजरंगीवर दंगल भडकावणे, वादग्रस्त विधाने करणे यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंगीने आपल्या व्हिडीओमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना लक्ष्य करत वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यानंतरच नूहमध्ये हिंसाचार उसळला, असे पोलिसांचे मत आहे. या हिंसाचारात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
संपूर्ण तयारीनिशी यात्रेत सामील व्हा, असे त्याने जनतेला सांगितले. बिट्टू बजरंगी आणि त्याच्या साथीदारांनी नूह येथे पोलिसांसमोर तलवारी आणि शस्त्रे घेऊन निदर्शने केली. हिंसाचार नूहपर्यंत पसरला होता. हिंसाचारात शेकडो वाहने जाळण्यात आली.
कोण आहे बिट्टू बजरंगी?
स्वतःला हनुमान भक्त म्हणविणाऱ्या फरिदाबादच्या बिट्टू बजरंगीचे खरे नाव राजकुमार आहे. भगवे कपडे परिधान करणारा बिट्टू अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करतो. तो स्वत:ला गोरक्षा बजरंग फोर्स नावाच्या संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगतो. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. ब्रिजमंडल यात्रेदरम्यान त्याने जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारे पोस्टरही वितरित केले होते.