नवी दिल्लीः ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये आज 'कमळ' फुललं आहे. गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपनं तिथे स्पष्ट बहुमत मिळवून माणिक सरकार यांचं सरकार खालसा केलंय, तर नागालँडमध्ये नव्या मित्राला सोबत घेऊन जुन्या मित्राला - नागा पीपल्स फ्रंटला धूळ चारली. त्यामुळे 'सेव्हन सिस्टर्स'पैकी पाच राज्यांत आता भाजपचा झेंडा फडकतोय. मेघालयमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात, पण आत्तातरी ईशान्येतील पाच राज्यं धरून देशातील एकूण २० राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आहे. काँग्रेसप्रणित यूपीएकडे फक्त पाच राज्य उरली आहेत. याचाच अर्थ, देशातील ६७.८५ टक्के जनतेवर एनडीएचं राज्य आहे.
भाजपकडील २० राज्यं
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा.
काँग्रेसची सत्ता असलेली पाच राज्यं
कर्नाटक, पंजाब, मेघालय, मिझोरम, पाँडेचरी
अन्य पक्षांचा 'षटकार'
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगण, केरळ, दिल्ली.
काँग्रेसची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे, तिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७.७८ टक्के जनता राहते. एनडीएची सत्ता असलेल्या २० राज्यांमधील लोकसंख्येचा विचार केल्यास, ६७.८५ टक्के जनतेचे ते राजे आहेत. तर उर्वरित २४ टक्के जनतेवर तृणमूल, अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, टीआरएस, डावे आणि आम आदमी पार्टी यांचं राज्य आहे.