Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय (Bharat Jodo Yatra) यात्रेवर रविवारी(दि.21) कथितरित्या हल्ला झाला. मणिपूरमधून सुरू झालेली यात्रा सध्या असामच्या सुनितपूरमध्ये आहे. यावेळी काही भाजप कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन काँग्रेसच्या यात्रेत शिरले. बसमध्ये राहुल गांधींना पाहताच त्यांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदी च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओनुसार, असामच्या सुनितपूरमधून जात असताना काही लोक हातात भाजप आणि श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे घेऊन भारत जोडो यात्रेत शिरले. यावेळी त्यांनी गाड्या अडवल्या आणि घोषणाबाजी केली. राहुल गांधी बसमधून हा सर्व प्रकार पाहत होते. दरम्यान, या लोकांनी राहुल गांधींना पाहताच घोषणाबाजी सुरू केली.
यानंतर राहुल गांधींनी बसमधून खाली उतरतात आणि त्या गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा कर्मचारी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा बसमध्ये बसवले. राहुल गांधी यांनीही त्यांच्या एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये काही लोक हातात भाजपचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधी त्यांना बसमधून Flying Kiss देतात आणि पुढे निघून जातात. या व्हिडिओसोबत त्यांनी प्रेमाचे दुकान सर्वांसाठी खुले आहे, असे कॅप्शनही दिले आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजवर आरोप केला आहे. काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर सुनितपूर इथे हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेच असं कृत्य करत आहेत. मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू, अशी स्पष्टोक्ती जयराम रमेश यांनी केली.