BJP: आंध्र नंतर तामिळनाडू, आणखी एक बडा नेता भाजपात, सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 05:02 PM2023-04-08T17:02:37+5:302023-04-08T17:03:18+5:30
C. R. Kesavan Joins BJP: आज तामिळनाडूमधील युवा नेते आणि देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
काल आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते किरण कुमार रेड्डी यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, आज तामिळनाडूमधील युवा नेते आणि देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. व्ही. के. सिंह, अनिल बलुनी आणि प्रेम शुक्ला यांच्या उपस्थितीत केसवन यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. भारत २०४७ मध्ये विश्वगुरू बनावा या दिशेने मी काम करेन. तसेच रामसेतू बांधण्यात खारीने जो वाटा उचलला होता, तसा वाटा मी उचलेन, असे केसवन यांनी यावेळी सांगितले.
भाजपात प्रवेश केल्यानंतर केसवन म्हणाले की, मला जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पंतप्रधान तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला ही बाब खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच जनकेंद्रीत धोरण, भ्रष्टाचार मुक्त शासन आणि सुधारणा आधारित समावेशी अजेंड्याने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं आहे.
केसवन यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना केसवन यांनी आपलं राजीनामापत्र पाठवलं होतं. आपल्या राजीनाम्यामध्ये केसवन म्हणाले होते की, मी गेल्या दोन दशकांपासून काँग्रेससाठी काम करत आहे. मात्र आता मी ज्यामुळे काँग्रेससाठी काम करतो होतो, ती मूल्ये आता कमी झाली आहेत.
सध्या जो काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यासोबत जुळवून घेणं शक्य होत नव्हतं. त्यामुळेच मी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच मी भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झालो नाही. आता वेगळ्या रस्त्यावरून पुढे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. केसवन यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टचाही राजीनामा दिला आहे.
दरम्यान, काल भाजपाने आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला जबर धक्का दिला होता. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते किरणकुमार रेड्डी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. किरण कुमार रेड्डी हे अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. किरण कुमार रेड्डी भाजपामध्ये आल्याने आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ अस्तित्व असलेल्या भाजपाला मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे.