गुजरातमधील सहाही महापालिकांमध्ये भाजपच; ‘आप’, एमआयएमचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:43 IST2021-02-24T02:13:43+5:302021-02-24T06:43:30+5:30
५७६ पैकी ४९० जागांवर विजय, ‘आप’, एमआयएम यांचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका

गुजरातमधील सहाही महापालिकांमध्ये भाजपच; ‘आप’, एमआयएमचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका
अहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने गड राखत निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण ५७६ जागांपैकी भाजपने ४९० जागा जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकीत माेठा फटका बसला असून केवळ ४८ जागा जिंकता आल्या आहेत. तर आम आदमी पार्टी व एमएआयएमने गुजरातच्या पालिकांमध्ये प्रवेश मिळविला, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
अहमदाबाद, सुरत, बडाेदा, राजकाेट, भावनगर आणि जामनगर येथील महापालिकांसाठी मतदान झाले हाेते. मंगळवारी त्याची मतमाेजणी झाली. भाजपने सर्व महापालिकांमध्ये सत्ता कायम ठेवली. काँग्रेसचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. ‘आप’ने सुरत महापालिकेत २७ जागा जिंकल्या. तर अहमदाबादमध्ये ‘एमआयएम’ ने ८ जागा जिंकून चंचूप्रवेश केला.
भाजपमध्ये उत्साह; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले जनतेचे आभार
निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ट्वीट केले असून गुजरातच्या जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मतदारांचे आभार मानून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचे अभिनंदन केले. विजय रुपाणी यांनीही महापालिका विजयानंतर मतदारांचे आभार मानले. ’ॲंटी इन्कम्बंसी’ गुजरातमध्ये लागू पडत नाही, असे ते म्हणाले.