नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक साडेतीन वर्षांनी होणार असली तरी भाजपने आतापासूनच तिची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देशभर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी योजना बनवली आहे. यासाठी ते लोकसभेच्या जागांनुसार बुथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करतील.
पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, नड्डा देशात वेगवेगळ्या ठिकाणी १२० दिवस प्रवास करतील. हा दौरा पुढील महिन्यापासून सुरू होईल. दौऱ्यात ते प्रदेश, जिल्हा स्तरापासून बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना सक्रिय करतील.निवडणूक धोरण निश्चित करण्यासाठी प्रदेशातील कोर समितीच्या नेत्यांशीही ते चर्चा करतील. नड्डा यांच्यासमोर कोर समितीच्या भविष्यातील योजनांचे तथा संभाव्य मुद्यांचे सादरीकरणही होईल. याशिवाय पक्षाच्या सोशल मीडिया व्हॉलिंटियर्सशीही ते संवाद साधतील.या दौऱ्यात सार्वजनिक सभांचेही आयोजन केले जाईल.
नड्डा बुद्धिजीवींशीही बोलतील व त्यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय मोदी सरकार राबवत असलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतील योजनांच्या लाभार्थींचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. भाजपची सत्ता असलेली राज्ये आणि भाजपचा सहयोग असलेल्या राज्यांच्या सरकारी योजना तथा कामकाजाचा आढावा संघटन स्तरावर घेतला जाईल. या दौऱ्यात नड्डा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) असलेल्या आपल्या मित्रपक्षांशी असलेल्या संबंधांना नवेपण देण्याचा प्रयत्न करतील. अरुण सिंह म्हणाले की, मित्रपक्षांच्या नेत्यांसाठी स्वतंत्र वेळ काढला जाईल. भाजपवर नाराज असलेल्या सहयोगींशीं पुन्हा संपर्क साधला जाऊ शकेल.