संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा (EAC-PM) एक अहवाल समोर आला आहे. यात, गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटल्याचे म्हण्यात आले आहे. या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक रिपोर्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''1950 ते 2015 दरम्यान हिंदूंचा वाटा 7.8% ने कमी झाला. तर मुस्लीम लोकसंख्या 43% ने वाढली. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीत आपल्यासोबत हेच केले. जर हा देश त्यांच्यासाठी सोडला, तर हिंदूंसाठी एकही देश उरणार नाही.''
केशव प्रसाद मौर्य यांचा निशाणा -उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही वाढती मुस्लीम लोकसंख्या चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणामुळे हे घडले आहे. ते मुस्लीम लीगप्रमाणे वागले आणि त्यामुळेच देशाने हा असमतोल पाहिला. यामुळे समान नागरी संहितेची (UCC) आवश्यकता आहे. या अहवालानुसार, 65 वर्षांत देशातील हिंदू लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43 टक्क्यांनी वाढली आहे. हा काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे.''
अहवालात काय? -इंग्रजी वेबसाइट हिन्दुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (ईएसी-पीएम) देशातील हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येशी संबंधित रिपोर्ट अथवा अहवाल शेअर केला आहे. यात, 1950 ते 2015 दरम्यान गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटली असून मुस्लीम लोकसंख्या वाढली असल्याचे, म्हणण्यात आले आहे.