लखनऊ:उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर भाजपसह अन्य पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात अन्य सर्व पक्ष असेही चित्र असल्याचे सांगितले जात आहे. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधक सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच भाजपनेही या निवडणुकांसाठी कंबर कसली असून, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भाजप नेत्यांची एक बैठक घेणार असून, निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह १२ नोव्हेंबर रोजी वाराणसी दौऱ्यावर असून, भाजप नेत्यांची एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ७०० भाजप नेते सहभागी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि प्रभारी धर्मेंद्र प्रधान हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळात ही भव्य बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रभारी आणि सहप्रभारी यांनाही वाराणसीला बोलावलेय
या बैठकीला ९८ जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी, सर्व ४०३ विधानसभा प्रभारी, ६ क्षेत्रीय अध्यक्ष, राज्यातील भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांसह प्रभारी आणि सहप्रभारी यांनाही वाराणसी येथे होणाऱ्या या बैठकीला बोलावले गेले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठ्या प्रमाणावर सदस्यता अभियान राबवणार आहे.
खासदार, मंत्री, आमदार अभियानाचे नेतृत्व करणार
उत्तर प्रदेश भाजप यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सदस्यता अभियान राबवले जाणार असून, यामध्ये सुमारे १.५ कोटी नवीन सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आताच्या घडीला भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये २.३ कोटी सदस्य आहेत. या अभियानाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते, खासदार, मंत्री, आमदार करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम योगी सरकार करत असून, पक्षाचे सदस्य होण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.