नवी दिल्ली - पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. याच दरम्यान भाजपाने आज परवर्तन यात्रेचे आयोजन केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहे. परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अमित शहांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जींचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?" असा सवाल त्यांनी केला आहे.
अमित शहा यांनी "आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे. ममता बॅनर्जींना सत्तेपासून दूर करणं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधारणं, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधारणं हेच आमचं प्राधान्य असणार आहे" असं म्हटलं आहे. भाजपाने सुरू केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. रॅलीमधून तसेच सभांमधून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
"हे सत्तांतर केवळ राजकीय नसेल तर गंगासागरमधील जनतेला सन्मान मिळवून देण्यासाठी असेल. या परिसरातील मासेमारी करणाऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी असेल. राज्यात ममता बॅनर्जी यांचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?, ममता सत्तेत असताना बंगाल विकासाच्या मार्गावर चालेल का?" असा सवाल देखील अमिच शहांनी केला आहे. यासोबतच भाजपा सत्तेत आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आम्ही महिलांसाठी 33 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ असं आश्वासन देखील दिलं आहे.
"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपाला बंगालमध्ये येऊ देणार नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
भाजपाला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार नाही." याचबरोबर, भाजपा खोटी आश्वसने देत आहे. शेतकऱ्यांना पैसे देत नाही, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. तसेच, राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकार प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देत असून त्यांच्यासाठी विनामूल्य पीक विम्याचीही व्यवस्था केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.