गुजरातमधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (BJP Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोकळ आश्वासने आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे असं म्हणत आप आणि काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी विकासाचे राजकारण करणाऱ्या मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला असं म्हणत विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत. अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. अमित शाह यांनी "गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"पोकळ आश्वासने आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे. तसेच विकासाचे राजकारण करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या विजयानंतर महिला, तरुण, शेतकरी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेला आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, आणि गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानतो" असं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे.
"आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो"
"आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचल्याचंही म्हटलं आहे. "आम आदमी पक्ष दिल्लीपुरता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो हेदेखील सिद्ध झालं आहे. प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"