- सुरेश भुसारीनवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील सात मतदारसंघांच्या लढतीमध्ये भाजप व आम आदमी पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसनेही प्रबळ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. पण त्या पक्षाला फार यशाची खात्री नाही. दिल्लीत अनेक वर्षे काँग्रेस व इतर विरोधी पक्ष अशा लढती होत. पण आम आदमी पार्टीच्या निर्मितीनंतर काँग्रेसच्या मतपेढीला जबर हादरा बसला. २००९ मध्ये सर्व जागांवर कब्जा करणाऱ्या काँग्रेसला २०१४ मध्ये केवळ १५ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले आणि काँग्रेसचा एकही उमेदवार त्या निवडणुकीत विजयी झाला नाही.आप व काँग्रेसची आघाडी न झाल्यास भाजपला निवडणूक सोपी जाईल, असे बोलले जात होते. पण चित्र बदलत आहे. काँग्रेसने प्रबळ व अनुभवी उमेदवारांना उतरविल्याने दिल्लीतील लढत तिरंगी झाल्या आहेत. आपची दिल्लीत मोठी मतपेढी आहे.काँग्रेसच्या पारंपारिक मतपेढीला आपने धक्का दिला आहे. काँग्रेस व आप हे एकमेकांची किती मते ओढतात. यावरच भाजपचे यश अवलंबून आहे. या निवडणुकीत काही जागा गमाविल्यास भाजपला धक्का बसेल. ‘आप’ला अपेक्षित यश न मिळाल्यास आठ महिन्यांनी होणाºया निवडणुकीत ‘आप’ला लोकांचा विश्वास जिंकणे कठीण जाईल.नवी दिल्लीहा मतदारसंघ अतिशय समृद्ध. सत्तेचे केंद्र असलेले संसद राष्ट्रपती भवन, मंत्री व अधिकाऱ्यांचे बंगले, बड्या मंडळींची निवासस्थाने येथे आहेत. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष असते. भाजपच्या मीनाक्षी लेखी येथील खासदार आहेत. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आव्हान दिले आहे. माकन २००४ व २००९ मध्ये निवडून आले होते. यावेळी आपने ब्रिजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र लढत मीनाक्षी लेखी व अजय माकन यांच्यातच होण्याची शक्यता आहे. अर्थात आपचा उमेदवार काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकतो.चांदणी चौक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदनी चौक मतदारसंघावर काँग्रेसचे पूर्वापर वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या निवडणुकीत डॉ. हर्षवर्धन यांनी काँग्रेसचा प्रभाव मोडीत काढला. यावेळी काँग्रेसने पुन्हा जयप्रकाश अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. आपने फरिदाबादचे पंकज गुप्ता यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसला आशा आहे. डॉ. हर्षवर्धन यांची प्रतिमा व कामांच्या भरवशावर ते अग्रवाल यांना लढत देत आहेत.उत्तर-पूर्व दिल्लीहेवीवेट नेत्यांचा हा मतदारसंघ आहे. भोजपुरी गायक व दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी व दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात लढत लक्षवेधी ठरणार आहे. यात आपने अमेरिकेतील नोकरी सोडून आलेल्या उच्चशिक्षित दिलीप पांडे यांना उमेदवारी देऊन रंगत तिहेरी केली आहे. शीला दीक्षित यांच्या उमेदवारीने मनोज तिवारी यांच्यापुढे आव्हान उभे झाले आहे.उत्तर-पश्चिम दिल्लीअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उदित राज यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसला जवळ केले व ते आता काँग्रेसचे स्टार प्रचारक झाले आहेत. वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदारसंघात भाजपने याच समाजातील पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने राजेश लिलोठिया यांना उमेदवारी दिली आहे. नेता विरुद्ध अभिनेता अशी लढत होणार आहे. आपने गुग्गन सिंह यांना उमेदवारी दिली आहे. यात भाजप-काँग्रेसमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.पूर्व दिल्लीक्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्या उमेदवारीने या मतदारसंघाला वेगळे वलय मिळाले आहे. विकासापासून काहीसा दूर असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री अरविंदर सिंग लवली यांना तर आपने उच्चशिक्षित आतिशी यांना उमेदवारी दिली आहे. आतिशी यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याने त्यांची प्रतिमा चांगली आहे. येथील तिन्ही उमेदवार तोडीस तोड आहेत.दक्षिण दिल्लीकाँग्रेसने येथून मुष्टीयोद्धा विजेंदर कुमार सिंग यांना उमेदवारी दिल्याने पुन्हा या मतदारसंघाकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. भाजपने रमेश बिधुडी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. आपने सीए असलेल्या ३० वर्षीय राघव चढ्ढा यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजप व आपमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.पश्चिम दिल्लीयेथे काँग्रेसने पु्न्हा महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने प्रवेश वर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आहे. साहिबसिंग वर्मा यांचे सुपुत्र असलेल्या प्रवेश यांचे येथे वर्चस्व आहे. आपने बलबीरसिंग जाखड यांना उमेदवारी दिली असून, येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 5:34 AM