नवी दिल्ली: सुमारे ११ कोटी सदस्यांसह जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला दिल्ली विधानसभा आणि पश्चिम बंगालच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत मात्र पक्षाच्या सदस्यांनीही मते दिली नाहीत.दिल्लीत भाजपाची सदस्य संख्या जवळपास ४२ लाखापर्यंत पोहोचली आहे. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पदरात केवळ २९ लाखच मते पडली. आणि फक्त तीन उमेदवार ७० सदस्य असलेल्या दिल्ली विधानसभेत पोहोचू शकले. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सदस्य नोंदणीच्या अखेरच्या दिवशी ४३ लाख सदस्य झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी जाहीर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या निकालात तुलनेत पक्षाला फारच कमी मते मिळाली आहेत. एकाही नगरपालिकेवर भाजपाला ताबा मिळविता आला नाही. यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग आणि निमलष्करी दलाच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या तर निकाल काही वेगळा राहिला असता. दिल्लीच्या संदर्भात पक्षाची सदस्य संख्या केवळ दिल्लीची नाहीतर संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. तत्पूर्वी शहा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी १ नोव्हेंबरपासून टेलिफोनवर मिस कॉलच्या माध्यमाने सुरू करण्यात आलेल्या सदस्य मोहिमेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी पक्षाच्या एकूण सदस्यांची संख्या ११ कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. उद्दिष्ट १० कोटी सदस्यांचे ठेवण्यात आले होते. सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेश,उत्तराखंडातभाजपाचे सर्वाधिक १ कोटी ८३ लाख सदस्य उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (१ कोटी १४ लाख) आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे १ कोटी ५ लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. याशिवाय पक्षाने दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासोबतच ओडिशा आणि आसामसारख्या राज्यांमध्ये जेथे भाजपा संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत समजली जाते सदस्यता मोहिमेत आश्चर्यकारक उंची गाठली आहे. या राज्यांमध्ये सदस्य संख्येत तीन ते दहा पट वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सदस्य वाढले पण मते घटली!
By admin | Published: May 01, 2015 10:48 PM