नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी बुधवारी (22 जानेवारी) जाहीर केली आहे. लोकप्रिय चेहऱ्यांसोबतच ज्येष्ठ नेत्यांना दोन्ही पक्षांनी स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलं आहे.
काँग्रेसपाठोपाठ भाजपाकडूनही आपल्या स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिल्लीत प्रचार करणार आहेत. सनी देओल, हेमा मालिनी, हंस राज, गौतम गंभीर, रवि किशन हे सेलिब्रिटी प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी यांच्यासह अनेकांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आहेत. यासोबतच नवजोतसिंग सिद्धू यांच्यासोबत भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही काँग्रेसचे स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील पक्षासाठी मत मागणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा, उदित राज यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. कपिल सिब्बल यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे.
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची तिसरी यादी जारी केली असून राज्यसभेचे माजी सदस्य परवेज हाश्मी यांना ओख्ला मतदारसंघातून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपनेही मंगळवारी दहा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली असून, नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुकेश शर्मा यांना विकासपुरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मेहरौली विधानसभा मतदारसंघातून मोहिंदर चौधरी यांना, तर बिजवासन विधानसभा दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी काँग्रेसने एकूण 66उमेदवार घोषित केले असून चार जागा आरजेडीसाठी सोडल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना
ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश
बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला