लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल पाहता भाजप व त्यास विरोध करणाऱ्या पक्षांना यापुढील काळात विजयाची समसमान संधी आहे. त्यामुळे यापुढील काळात विजयाचे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे पाहायला हवे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले आहे.
विधानसभा व लोकसभा जागांच्या पोटनिवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करताना त्यांनी नमूद केले आहे की, विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपने सात तर त्याच्या घटक पक्षांनी आठ जागा जिंकल्या. काँग्रेसनेही सात जागांवर विजय मिळविला आहे. बिगरभाजप पक्षांनी काही जागांवर विजयाची नाममुद्रा उमटविली आहे. याचाच अर्थ यापुढील काळात भाजप व विरोधी पक्षांना विजयासाठी समसमान संधी आहे. पोटनिवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अहंकारी वृत्ती आता सोडायला हवी. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हवा आणि पेट्रोल, डिझेलच्या सतत वाढत्या किमती रोखण्यासाठी पावले उचलायला हवीत. काँग्रेसला पक्षकार्यकर्त्यांमुळेच पोटनिवडणुकांत विजय मिळाला आहे
सहा राज्यांकडे लक्ष गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड या चार राज्यांच्या निवडणुका पुढील वर्षी मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील विद्यमान विधानसभेची मुदत पुढील वर्षी मेमध्ये संपणार आहे. पुढील डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होतील. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी या राज्यांत जय्यत तयारी चालवली आहे.