- विधानसभा पोटनिवडणूक नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. या ५ पैकी ३ जागा भाजपाकडेच होत्या. मात्र दिल्लीत आपचा, तर राजस्थानात बसपाचा पराभव करून भाजपाने २ जादा जागा मिळवल्या. कर्नाटकातील २ आणि मध्य प्रदेशातील १ अशा ३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले असून, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचा उमेदवार विजयी झाला आहे. रविवारी या राज्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सात राज्यांतील १0 जागांसाठी हे मतदान झाले होते. याशिवाय श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. कर्नाटक, मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन तर, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका जागेवर निवडणूक झाली होती. कर्नाटकातील नानजनगुड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कालाले एन. केशवमूर्ती यांनी भाजपचे के. व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. गुंडलुपेट मतदारसंघातून काँग्रेसच्या गीता महादेवप्रसाद यांनी भाजपचे सी.एस. निरंजन कुमार यांचा १० हजार मतांनी पराभव केला. या दोन्ही जागा पूर्वी काँग्रेसकडेच होत्या. एक वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. झारखंडच्या लिट्टपाडा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे सायमन मरांडी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपचा उमेदवार पराभूत झाला.
आपने जरनैैल सिंह यांच्यावर फोडले पराभवाचे खापर राजौरी गार्डन पोटनिवडणुकीतील आपच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर पक्षाने माजी आमदार जरनैैल सिंह यांच्यावर फोडले आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जरनैैल सिंह यांच्या राजीनाम्यामुळे लोक नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात पक्षाला यश मिळाले नाही. दरम्यान, दिल्लीत महापालिकेसाठी होणाऱ्या मतदानापूर्वीच भाजपला मिळालेला हा विजय त्या पक्षासाठी चांगले संकेत मानले जात आहेत. या ठिकाणी आप तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. भाजप - शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांना एकूण मतांच्या ५० टक्के म्हणजे ४०,६०२ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या मिनाक्षी चंदेला यांना २५,९५० आणि आपच्या हरजीत सिंह यांना केवळ १०,२४३ मते मिळाली आहेत.