इंदुरः भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणावरून भाजपा आणि संघावर निशाणा साधला आहे. संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणं आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरं कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत.आरएसएसचे कार्यकर्ते जमावाला हिंसेसाठी भडकावतात. आकाश विजयवर्गीस म्हणाला होता, पहिल्यांदा अर्ज, विनंती देतो, तरीही नाही ऐकल्यास फटके देतो. या मानसिकतेमुळेच जमाव हिंसा करण्यासाठी प्रेरित होतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नेत्यांच्या अशा बेताल वागण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत केले होते. आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे सोमवारी म्हटले होते. तसेच यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील विजयवर्गीय यांनी सांगितले होते. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.
संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात- दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 2:04 PM