नवी दिल्ली - हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "मेहबूबा मुफ्तींचा DNA दोषपूर्ण, त्यांनी भारतीय असल्याचं सिद्ध करावं"; असं विधान करत विज यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या एका ट्विटला प्रत्युत्तर देताना अनिल विज यांनी हल्लाबोल केला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी ट्विट करत भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्या काश्मिरींच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला आता उत्तर दिलं आहे.
"मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांचा डीएनए (DNA) हा दोषपूर्ण आहे आणि त्यांना स्वतःला भारतीय असल्याचं सिद्ध करावे लागेल" असं अनिल विज (BJP Anil Vij) यांनी म्हटलं आहे. तसेच हे विधान करण्याआधी त्यांनी एक ट्विट देखील केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी "पाकिस्तानने भारताविरोधातील क्रिकेट सामना जिंकल्यावर भारतात फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय असूच शकत नाही. तुमच्या घरात लपलेल्या गद्दारांपासून सावध राहा" असं म्हटलं आहे.
"पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्या काश्मिरींवर इतका राग का?"
रविवारी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना झाला. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यानंतर सोमवारी मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं होतं. "पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्या काश्मिरींवर इतका राग का? काही जण तर देशद्रोह्यांना गोळी मारा अशा घोषणा देत आहेत. जम्मू आणि काश्मीरचे विभाजन केले आणि ऑगस्ट 2019 मध्ये राज्याचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आल्यावर मिठाई वाटून उत्सव साजरा केला गेला हे कोणीही विसरलेलं नाही" असं मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणात देखील उडी घेतली होती. "चार शेतकऱ्यांच्या हत्याचा आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात कारवाई करण्याऐवजी केंद्रीय एजन्सी 23 वर्षांच्या मुलाला केवळ त्याचं नाव खान आहे म्हणून लक्ष्य करत आहे. व्होट बँकेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष केलं जात आहे" असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं होतं.