Jammu and Kashmir elections : नवी दिल्ली : पाच वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने सोमवारी आपल्या ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, आता ही यादी काही वेळातच मागे घेण्यात आली. दरम्यान, ही यादी आणखी काही अपडेट्ससह जाहीर केली जाऊ शकते, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप या यादीत काही बदल करणार आहे. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावे होती. विशेष बाब म्हणजे, या यादीत माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना तिकीट देण्यात आले नव्हते. तर या यादीत काश्मीर खोऱ्यातील दोन जागांवर भाजपने काश्मिरी पंडित यांना उमेदवारी दिली होती. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, मुद्दे, उमेदवारांची नावे आणि नरेंद्र मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, या बैठकीनंतर आज भाजपकडून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही यादी काही वेळातच मागे घेण्यात आली. आता नवीन यादी भाजप लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदानजम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या ९० सदस्यीय विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
पक्षांतराचे वारे दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर या भागातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर निष्क्रिय झालेले अनेक राजकीय नेते आता नव्या पक्षांमध्ये सामील होत आहेत. ताज्या घडामोडीत अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर अपना पार्टीचे संस्थापक सदस्य जफर इक्बाल मन्हास यांनी राजीनामा दिला असून ते मुलासह काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे.