नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. भाजपाच्या या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कर्नाटकातील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य उमेदवारांवर चर्चा करून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
karnataka election 2018- भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2018 11:29 PM