नवी दिल्ली - पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपाकडून महाराष्ट्रातील दोन उमेदवारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील एक नाव हे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या पीयूष गोयल यांचे आहे. तर दुसरे उमेदवार म्हणून डॉ. अनिल बोंडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, यावेळी त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेसाठी दुसरे उमेदवार म्हणून डॉ. अनिल बोंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अनिल बोंडे हे फडवीस सरकारमध्ये मंत्री होते. तसेच गेल्या काही काळापासून ते राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.
दरम्यान, भाजपाने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मध्य प्रदेशमधून कविता पाटिदार, कर्नाटकमधून निर्मला सीतारामन आणि जगदीश, राजस्थानमधून घनश्याम तिवारी, उत्तर प्रदेशमधून लक्ष्मीकांत वाजपेयी, राधामोहन अग्रवाल, सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, उत्तराखंडमधून कल्पना सैनी, बिहारमधून सतीश चंद्र दुबे, शंभू शरण पटेल, हरयाणामधून कृष्णलाल पवार यांची नावे जाहीर झाली आहेत.