नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातू भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लालकृष्ण अडवाणी लढणार आहेत की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपाच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
यावेळी जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, बिहारमधील सर्व 17 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहेत. पहिल्या यादीत एकूण 20 राज्यातील काही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी (नागपूर), राजनाथ सिंह (लखनऊ), डॉ. सत्यपाल सिंह (बागपत), हेमा मालिनी (मथुरा), व्ही. के. सिंग (गाझियाबाद), साक्षी महाराज (उन्नाव), स्मृती इराणी (अमेठी) या आणखी काही प्रमुख नावांचा समावेश आहे.
याचबरोबर, या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे आहे. यात अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेवारी देण्यात आली आहे. तर, लातूरमधून सुधाकर राव शिंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.