Anurag Thakur vs Rahul Gandhi, Drugs: दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तब्बल ६०२ किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची एकूण किंमत ५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये ५६० किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजाचा समावेश आहे. भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी अंमली पदार्थ जप्तीप्रकरणी काँग्रेसवर काही प्रश्न उपस्थित केले. दिल्लीतील ५ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्ती प्रकरणातील आरोपी काँग्रेस पदाधिकारी तुषार गोयलचा हुड्डा कुटुंबाशी काय संबंध आहे?, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर राहुल गांधींनी आता काँग्रेसमध्येही ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला आहे का? असा खोचक प्रश्न त्यांनी केला.
दिल्लीत ड्रग्ससंबधी पकडण्यात आलेली ही सर्वात मोठी कन्साइनमेंट आहे. याप्रकरणी छापा टाकत पोलिसांनी किंगपीन तुषार गोयल याच्यासह चौघांना अंमली पदार्थांसह अटक केली. आता यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तुषार गोयल यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याच्या कारणावरून भाजपाने टीका केली आहे. याचबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी तुषार गोयल हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे. जावई आणि दलालांनंतर आता काँग्रेस ड्रग्ज विक्रेत्यांचेही आश्रयस्थान बनली आहे का?
"आरोपी तुषार गोयल हा हरयाणाच्या माजी मुख्यमंत्री हुड्डांचा निकटवर्तीय'
अनुराग ठाकूर यांनी आरोपी तुषार गोयलचे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री दीपेंद्र हुड्डा यांचे निकटवर्तीय असे वर्णन केले आणि दीपेंद्र हुड्डा आरोपींच्या किती जवळचे आहेत ते सांगावे, असे टोलाही लगावला. "देश अंमली पदार्थमुक्त व्हावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण काँग्रेसचे नेतेच दिल्लीत अंमली पदार्थाचा व्यापार चालवत असताना हे कसे होणार? काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करू शकते हे यावरून सिद्ध होते. काँग्रेसची इच्छा नाही का? याचे उत्तर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यावे," असे अनुराग ठाकूर म्हणाले.
"अंमली पदार्थांच्या तस्करीतून काँग्रेसने हरयाणा निवडणुकीत किती पैसा गुंतवला? अंमली पदार्थ पकडल्यावर काँग्रेस वारंवार यामुळेच विरोध करते का? आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दारुचा साठा पकडून त्यावर बुलडोझर चालवला, त्याचा काँग्रेसने विरोध का केला? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे," असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसचे म्हणणे आहे की आरोपी तुषार गोयल याची पक्षातून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय युवक काँग्रेसने ड्रग्ज जप्तीबाबत भाजपाने केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. तुषार गोयल यांची पक्षविरोधी कारवायांमुळे १७ ऑक्टोबर २०२२ मध्येच संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचा दावा संघटनेने केला.