नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपाच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर याच कालावधीत काँग्रेसच्या संपत्तीत १५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली. सात राष्ट्रीय पक्षांनी २०१६-१७ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षातील संपत्ती आणि रोख रकमेची माहिती जाहीर केली होती. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या सामाजिक संघटनेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, सीपीआय, सीपीएम आणि तृणमूल काँग्रेस या सात पक्षांनी त्यांच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. मात्र ही माहिती देत असताना या पक्षांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केल्याचं एडीआरनं म्हटलं आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील राष्ट्रीय पक्षांकडे ४६५.८३ कोटी रुपयांची सरासरी संपत्ती होती. २०१७-१८ या वर्षात सरासरी संपत्तीचा आकडा ४९३.८१ कोटींवर जाऊन पोहोचला. गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजपाची संपत्ती २२.२७ टक्क्यांनी वाढली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपाची संपत्ती १२१३.१३ कोटी होती. वर्षभरात भाजपाच्या संपत्तीचा आकडा १४८३.३५ कोटींवर जाऊन पोहोचला. भाजपाची संपत्ती वाढत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपत्तीत मात्र घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये काँग्रेसकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य ८५४.७५ कोटी होतं. मात्र सध्या काँग्रेसकडे ७२४.३५ कोटींची संपत्ती आहे. वर्षभरात काँग्रेसची संपत्ती १५.२६ टक्क्यांनी घटली आहे. सध्या गळतीमुळे त्रस्त झालेल्या राष्ट्रवादीची आर्थिक परिस्थितीदेखील फारशी चांगली नाही. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीच्या गंगाजळीत ११.४१ कोटी रुपये होते. मात्र आता राष्ट्रवादीकडे ९.५४ कोटी रुपये आहेत. वर्षभरात राष्ट्रवादीची संपत्ती १६.३९ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र याच कालावधीत तृणमूलची संपत्ती १०.८६ टक्क्यांनी वाढली. वर्षभरापूर्वी तृणमूलची संपत्ती २६.२५ कोटी रुपये होती. आता ती संपत्ती २९.१० टक्क्यांवर गेली आहे.
सत्ताधारी मालामाल; भाजपाच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 4:52 PM