"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 02:01 PM2024-04-28T14:01:59+5:302024-04-28T14:05:40+5:30
प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दीपक बाबरिया आम्हाला पक्ष चालवू देत नव्हते. माझ्या सल्ल्याने कोणतीच नियुक्ती केली जात नव्हती. प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, भ्रष्ट लोकांच्या इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही परस्पर सहमती नाही. ज्या काँग्रेस पक्षात लोकशाही नाही किंवा सेवेचा विचार नाही. त्या पक्षात मूल्यांना महत्त्व देणारे लोक अस्तित्वातच राहू शकत नाहीत. सहा दशके देशाला लुटणारी काँग्रेस आता अंताकडे वाटचाल करत आहे, असे वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.
दुसरीकडे, भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे घडणारच होते. काँग्रेसला शिव्या देऊन ज्यांचा राजकीय जन्म झाला, तो आम आदमी पक्ष (आप) आणि अरविंद केजरीवाल यांनी आज केवळ मोदींच्या भीतीपोटी एकमेकांची गळभेट घेण्यास मजबूर झाले आहे. ही काँग्रेसच्या मूर्खपणाची पराकाष्ठा होती.
पुढे हर्षवर्धन म्हणाले की, दिल्लीत काँग्रेस-आप यांच्यात आघाडी कधीच नव्हती. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांनी ती कधीच मान्य केली नाही. आज मी गॅरंटीने सांगतो की, 4 जूनच्या दुपारपर्यंत या ठगआघाडीचे नेते एकजूट राहतील. त्यानंतर पुन्हा इतरांना शिव्या देणे सुरू करतील. अरविंदर सिंग लवली यांनी पक्ष सोडणे, ही फक्त एक सुरुवात आहे. आता अशा अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांचा अंतरात्मा जागा होईल.
(काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा)