हरीश गुप्ता
नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते या नात्याने केलेल्या पहिल्या भाषणात राहुल गांधी यांच्या काही खोट्या आणि निराधार वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रचंड दबाव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर आहे.
एकापाठोपाठ एक मंत्री राहुल गांधी यांना खोटेपणा पसरवू नका आणि अग्निवीर योजना, शेतकऱ्यांना एमएसपी आदींबाबत बिनबुडाचे आरोप करू नका, असे वारंवार सांगत होते. यादरम्यान लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संयम राखला. राहुल गांधी यांच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनदा त्यांच्या जागेवरून उठले.
९० मिनिटांच्या भाषणात लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना अनेकवेळा थांबविले आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, बिर्ला यांनी राहुल गांधींच्या भाषणातील कोणताही भाग हटवण्याचे टाळले. त्यांनी राहुल गांधी यांना सावध केले. परंतु, कोणत्याही कारवाईचा इशारा दिला नाही. त्याऐवजी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाचे नियम पाळावेत, अशी विनंती करत राहिले.
लिहून घ्या, पराभव करणार
गेल्या १० वर्षांत राज्यघटनेवर हल्ला करण्यात आला आहे. अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यांनी यानंतर स्वत:सह अनेक नेत्यांवर झालेल्या कारवाईचा संदर्भ दिला. ‘इंडिया आघाडी गुजरातमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार हे लिहून घ्या, असे राहुल गांधी म्हणाले.
काय आहेत शक्यता?१८ व्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने राहुल गांधींवर कारवाई होऊ नये, असे अनेकांना वाटते. त्यांच्या भाषणातील काही विशिष्ट भाग रेकॉर्डमधून हटवावा. परंतु, सत्ताधारी अध्यक्षांना लेखी विनंती करू शकतात की, केवळ त्यांच्या भाषणातील विधाने हटवू नयेत. तर, त्यांना चेतावणी दिली जावी. पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर जोरदार हल्ला करण्यासाठी कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतरांना मैदानात उतरविल्यानंतर भाजपने संसदेबाहेर आक्रमकता दाखविली.