काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंवर राजकारण करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंदर्भात बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेला ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्ही चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे.
यासंदर्भात, पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे. भारत सरकारने याबाबत डब्ल्यूएचओकडे आक्षेपही नोंदवला आहे. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीवरून संपूर्ण जगात भारतासंदर्भात भ्रामक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा राहुल गांधींवर निशाणा -पात्रा म्हणाले, राहुल गांधी सातत्याने भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत वारंवार भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू आणि जन्मासंदर्भातील आंकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी भारताकडे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे.
WHO ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात, कोरोना व्हायरसमुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा आकडा भारताच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. भारत सरकारने WHO च्या या आकडेवारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. पात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने ज्या प्रकारे कोरोनाचा सामना केला, ते अद्भुत आणि अद्वितीय होते. एवढेच नाही, तर ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण होते, असे संपूर्ण जग मानते. असे असताना मृत्यूच्या आकड्यांवर राजकारण करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.