यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे दिल्लीतील जनता शहरातील पुराच्या पाण्याचा सामना करत आहे. त्याचवेळी भाजपा आणि आम आदमी पक्ष हे एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दिल्ली पुराच्या मुद्द्यावरून आप सरकारने केंद्राला घेरलं आहे.
आता भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. तसेच केंद्र काम करत आहे. त्यामुळे 'आप'ला आरोप करण्याऐवजी कामाला लागण्याची सूचना भाजपाने केली आहे. आप सरकार केवळ दोषारोप करत असल्याचेही भाजपाने म्हटलं आहे. याआधी देखील आप सरकारने दिल्ली पुराच्या मुद्द्यावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे.
पुरावरून राजकारण तापलं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली, हथिनीकुंडचे जास्तीचे पाणी फक्त दिल्लीला पाठवले गेले.' सौरभ भारद्वाज यांचा दावा आहे की, "हथिनीकुंडमधून फक्त दिल्लीसाठी पाणी सोडण्यात आले, तर पश्चिम कालव्यासाठी पाणी सोडले नाही. यावरून राजकारण केलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयासह दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या इमारती बुडवण्याचा कट होता."
आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, "हिमाचल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि यूपी या पुरामुळे पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नाही, मग पुराचं कारण काय? याचे कारण भाजपा आणि केंद्राचा दिल्लीप्रती असलेला द्वेष, दिल्ली नष्ट करण्याचे षडयंत्र, मोदीजींचा दिल्लीबद्दलचा द्वेष. ही आपत्तीची स्थिती आहे, ती देशाच्या कोणत्याही भागात येऊ शकते. हा एक प्रायोजित पूर आहे, एक प्रायोजित आपत्ती आहे. मोदीजी देशाला सोडून फ्रान्सला गेले आहेत."