नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाहीवर केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजपकडून सातत्याने राहुल यांच्या माफीची मागणी केली जात आहे. यातच आता आज(मंगळवार) भाजपने राहुल गांधींना आजच्या काळातील भारतीय राजकारणातील 'मीर जाफर' म्हटले.
राहुल गांधींनी परदेशी भूमीवर भारताचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दावा केला की, देशाविरुद्ध बोलणे हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी खूप साधी गोष्ट आहे. आज पत्रकारांना संबोधित करताना संबित पात्रा म्हणाले की, मीर जाफरने नवाब बनण्यासाठी जे केले, तेच राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले. राजपुत्राला नवाब बनायचे आहे…पण आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल. ते माफी न मागता निघून जातील, असे त्यांना वाटत असेल. पण, त्यांना माफी मागावीच लागेल,' असे संबित पात्रा म्हणाले.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू झाला. पहिल्या दिवसापासून अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी आणि राहुल यांच्या माफीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या गदारोळामुळे लोकसभेत गेल्या आठवड्यात काहीच कामकाज होऊ शकले नाही.