ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बुधवारचा घटनाक्रम पाहता भाजपाने बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्षात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना गुरमेहर कौरला एकटी सोडलं पाहिजे असं मान्य केलं आहे. या संपुर्ण प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं असं पक्षाला वाटत आहेत.
गुरमेहर कौरवर निशाणा साधणारा क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अभिनेता अनुपम खेरदेखील बॅकफूटवर जाताना दिसले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून माघार घेत पुन्हा जालंधरला जाण्याचा निर्णय गुरमेहरने घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी समर्थनार्थ उतरले होते. याआधी गुरमेहर कौरला ऑनलाइन ट्रोल केलं जात असताना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीदेखील बुधवारी बोलताना 'शहीदाच्या मुलीला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क असून तिला ट्रोल करणं चूक असल्याचं', सांगितलं. रवीशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा कॅम्पमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे', असंही रवीशंकर बोलले आहेत.
दुसरीकडे याच मुद्द्यावर ट्विट करुन वादात भर घालणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील आपली भूमिका बदलली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ट्विट कर त्यांनी विचारलं होतं की, 'माहित नाही या मुलीचं डोकं कोण प्रदुषित रत आहे ?'. गुरमेहरला मिळालेल्या धमकींबाबत विचारलं असता आपल्याला याबद्दल माहित नसल्याचं ते बोलले होते. 'मी प्रचारसभांमुळे मणिपूरमध्ये व्यस्त होतो, मला सर्व गोष्टींची माहिती नाही. मी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो', असं किरेन रिजिजू बोलले.
विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत, 'प्रत्येकाला न घाबरता आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. मग ती गुरमेहर कौर असो किंवा फोगट भगिनी', सांगितलं आहे. अनुपम खेर यांनीदेखील गुरमेहरची बाजू योग्य असल्याचं सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, 'युद्ध होऊ नये असं तिचं म्हणणं योग्य आहे. सीमेवर तैनात सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी असून गोळी खाण्यासाठी नाही'. क्रिकेटर गौतम गंभीर आणि विद्या बालन यांनीही गुरमेहरचं समर्थन केलं आहे.
संपुर्ण वादानंतर एबीव्हीपीनेदेखील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.