भाजपाने विरोधकांना धक्का देण्यासाठी लोकसभेची पहिली यादी जाहीर केली खरी परंतु, आतापर्यंत दोन उमेदवारांनी मिळालेले तिकीट परत केले आहे. एकीकडे नेते तिकीट मिळविण्यासाठी धडपड करत असताना १९५ पैकी दोन उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
भाजपाचे उत्तर प्रदेशमधील बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी तिकीट परत केले आहे. त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे तिकीट परत केले आहे. जोपर्यंत मी निर्दोषत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत मी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी खासदारांचे प्रतिनिधी दिनेश चंद्र रावत यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा व्हिडीओ खोटा असून एडिट केलेला आहे. पोलिसांनी याचा निष्पक्ष तपास करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.
उपेंद्र सिंह रावत यांनी हे व्हिडीओ २०२२-२३ मधील असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर एआयद्वारे माझा चेहरा लावण्यात आला आहे. मला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केले गेले आहे. माझी प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे रावत यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये परदेशी महिला दिसत आहे. यावर ३१ जानेवारी २०२२ अशी तारीख दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ मे २०२२ चा असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर अन्य काही व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आले आहेत. यावरून भाजपा रावत यांना दिलेले तिकीट काढून घेऊ शकते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
याआधी भोजपुरी स्टार पवन सिंहने आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. या जागेवरून टीएमसी नेते शत्रुघ्न सिन्हा सध्या खासदार आहेत.