नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार स्थापन होऊन एक वर्षही झाले नाही. मात्र भाजपकडून लगेचच 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आंध्रप्रदेशात अभिनेते पवन कल्याण यांच्या जन सेवा पक्षाशी युती केली आहे.
भाजप आणि जन सेवा पक्षाने व्यापक चर्चेनंतर गुरुवारी युतीची घोषणा केली. अभिनेते पवन कल्याण जनसेवा पक्षाचे प्रमुख आहेत. पवन कल्याण म्हणाले की, राज्यातील जनता तेलगु देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस सोडून तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने भाजपसोबत हात मिळवला आहे. दोन्ही पक्ष स्थनिक निवडणुकांसह 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार आहे. किंबहुना दोन्ही पक्षांनी 2024 ची तयारी सुरू केली आहे.
राज्य भाजपचे अध्यक्ष कन्ना लक्ष्मी नारायण यांनी म्हटले की, भाजप आणि जन सेवा पक्षाच्या युतीचा उद्देशच मुळात राज्याचे रक्षण करणे आहे. आगामी काळातील स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासूनच आमची युती राज्याच्या भल्यासाठी काम करणार आहे. उभय पक्षांकडून तेलगू देसम पक्षाच्या भ्रष्ट्राचारावर आणि वायएसआर काँग्रेसच्या धोरणांवर टीका यावेळी करण्यात आली.