ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून बिहारमधील महाआघाडीत निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. राष्ट्रपती निवडणुकीत घेतलेल्या वेगळ्या भूमिकेनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमारांवर टीका केल्यावर आता जनता दल युनायटेडच्या नेत्यांच्या मनातील दुखणे समोर आले आहे. महाआघाडीपेक्षा भाजपासोबतची आघाडी अधिक सुटसुटीत होती, असे मत जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे महासचिव के.सी. त्यागी यांनी मांडले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपती निवडणुकीत रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. आझाद यांची ही टीका जेडीयू नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. दरम्यान, त्यागी म्हणाले, "जेडीयूची भाजपासोबत असलेली आघाडी सुटसुटीत होती. त्यांच्यासोबत काम करण्यात वैचारिक अडचण होती. पण काम करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती." आम्ही बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार पाच वर्षे चालवू इच्छितो, पण कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधातील टीका खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यागी यांनी सांगितले.
मीरा कुमार यांना पराभूत होण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनवण्यात आले आहे, असे नितीश कुमार म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना "जी माणसे एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवतात, ती केवळ एकच निर्णय घेऊ शकतात, तर ज्यांचा अनेक विचारधारांवर विश्वास असतो ते अनेक प्रकारचे निर्णय घेतात," असा टोला आझाद यांनी लगावला होता.