पाटणा : बिहारमध्ये मतदारांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सलग चौथ्यांदा पसंती दर्शवली असली तरी २० वर्षांनंतर प्रथमच भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी भाजपला ५३ जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंतच्या बिहारी राजकारणात रालोआमध्ये नितीशकुमार यांचे वर्चस्व होते. जदयुला सतत मिळत असलेल्या अधिक जागा, हे त्याचे कारण होते. त्यामुळे भाजपनेही लहान भावाची भूमिका स्वीकारली होती. परंतु आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने तेथील गणिते बदलू शकतात.
२० वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजप आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या २० वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल.
ईव्हीएम हॅक करणे अशक्य
पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का हाेऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयाेगाने हा दावा खाेडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयाेगाने म्हटले आहे. तर, काँग्रेसचेच कार्ती चिदंबरम यांनी उदीत राज यांचे नाव न घेता ईव्हीएम हॅकींगचा मुद्दा आता थांबवायला हवा, असे मत व्यक्त केले. ईव्हीएम हॅक हाेऊ शकतात हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही, असे ट्वीट त्यांनी केले.