अजित पवारांची राष्ट्रवादी आपली प्रतिमा सुधरविण्यासाठी महाराष्ट्रभर प्रयत्न करत आहे. एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड़ची निवडणूक लागू शकते. अशावेळीच भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे.
पलामू जिल्ह्याच्या हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमलेश कुमार सिंह यांनी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची भेट घेतली होती. शर्मा हे झारखंडचे प्रभारी आहेत. राष्ट्रवादी आमदार कमलेश कुमार ३ ऑक्टोबरला भाजपात सहभागी होणार आहेत.
भाजपात जाताच कमलेश यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कमलेशकुमार यांच्यासह त्यांचा मुलगा सुर्या सोनल यानेही शर्मा यांची भेट घेतली. हुसैनाबादवर भाजपासह आजसू पक्षाने देखील दावा सांगितलेला आहे. कमलेश कुमार यांनी सोरेन सरकारचे समर्थन काढून घेतले होते. तसेच भाजपाची साथ दिली होती. इकडे महाराष्ट्रात अजित पवारही भाजपासोबत गेले होते. यामुळे कमलेश यांना भाजपात उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
हुसैनाबादमधून विनोद सिंह, प्रफुल्ल सिंह, कर्नल संजय सिंह, रविंद्र सिंह, कामेश्वर कुशवाहा आणि अशोक सिंह यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच आजसू पक्षाकडून माजी आमदार कुशवाहा शिवपूजन मेहता आणि माजी आयपीएस अधिकारी संजय रंजन सिंह यांच्याही नावाची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पलामू लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती. 20 हजार मतांनी भाजपाचा उमेदवार आघाडीवर होता. ही मते कमलेश सिंह यांनी वळविली होती. यामुळे त्याची परतफेड कमलेश यांनाच उमेदवारी देऊन केली जाण्याची शक्यता आहे.