नवी दिल्ली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. "राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी "उत्तर भारतीय आणि मराठी माणूस यांच्यातील वाद मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी निर्माण केला. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मी पक्षाशी या संबंधित बोललेलो नाही. मी व्यक्तिगत स्तरावर मोठी तयारी करत आहे. त्यांनी विचार केला नसेल इतकी मोठी तयारी करत आहे. माझ्यासोबत उत्तर भारतीय देखील मोठ्या संख्येने आहेत. पक्षाचं वेगळं मत आहे. पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही. राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही. त्यांनी खेद व्यक्त करावा" असं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते पुन्हा एकदा कडाडले असून त्यांनी सर्वत्र बॅनर लावले आहेत. यामध्ये राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा परत जा असं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये 5 जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचं म्हटलं आहे. 5 जूनला अयोध्येला जायचं असल्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पोस्टर्स लावून पाठिंबा देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी असंही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असं देखील ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. "उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी" असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.
"राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे" असंही ते म्हणाले. यासोबतच "राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही" असं देखील ट्विटमध्ये म्हटलं आहे.