नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असं देखील ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. यानंतर आता मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांनाच फोन केला आहे.
मनसे कार्यकर्ता तुलसी जोशी यांनी भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंह यांना फोन केला. यावेळी त्यांच्यात काही सेकंदाचे संभाषण झाले. यावर "आम्ही सल्ला घेत नाही तर योगींना आम्हीच सल्ला देतो" असं म्हणत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे कार्यकर्त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याची एक ऑडिओ क्लीप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. "नमस्कार. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. माझे नाव तुलसी जोशी आहे. मी राज ठाकरे यांचा छोटासा मनसैनिक आहे. आपण प्रभू रामचंद्र अयोध्यामधून खासदार आहात. राज ठाकरे यांच्याविरोधात विधान केले तर तुमच्या नावाची गिनिज बुकमध्ये, लिम्का बुकमध्ये तुमची नोंद होणार नाही."
"तुम्ही राज ठाकरे यांच्याबाबत विधान केले आहे. पण तुम्ही समजूतदार व्यक्ती आहात. त्यामुळे याबाबत योगींकडून सल्ला घ्या. योगींचा सल्ला घ्या असं म्हणताच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपलं परखड मत मांडलं. योगींकडून आम्ही सल्ला घेत नाही. योगींना गरज पडली तर त्यांनी आमच्याकडून सल्ला घ्यावा" असं म्हटलं आहे. याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका मराठी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
"उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी" असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे. "राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे" असंही ते म्हणाले. यासोबतच "राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही" असं देखील ट्विटमध्ये म्हटलं आहे.