कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क केला जात आहे. तुम्हाला किती पैसा हवा, आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला हवा तितका पैसा देतो, आमच्या पक्षात या,' अशा ऑफर दिल्या जात असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात प्रचंड पैसा आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. 'बंगालमध्ये ट्रेननं काहीजण रोख रक्कम घेऊन येत आहेत. मतदारांना वाटण्यासाठी हा सर्व पैसा आणला जात आहे. याबद्दली स्रव माहिती माझ्याकडे आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. 'मोदी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. त्यांचा शेवट जवळ आला आहे,' अशी टीका ममता यांनी केली. 'भाजपाकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे आता लोकांना बदल हवा आहे,' असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुनदेखील त्या सरकारवर बरसल्या. 'पाकिस्तानविरुद्ध युद्धाच्या नावाखाली पंतप्रधान मोदी जवानांच्या जीवाशी खेळत आहेत,' असं टीकास्त्र त्यांनी सोडलं. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकींच्या रॅली काढून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:34 PM