लखनौ : केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा आमच्या पक्षाची प्रतिमा कलंकित करण्यासाठी गैरवापर करीत आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मंगळवारी येथे केला. बसपच्या बँक खात्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १०४ कोटी रुपये असल्याचे शोधल्यानंतर, मायावती यांनी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘बँक खात्यातील सगळ््या ठेवी या राजकीय पक्षांसाठीच्या नियमांनुसारच असून, त्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर व्हायच्या आधीच जमवलेल्या आहेत. आता आम्ही तो पैसा फेकून द्यायचा का?’ काही महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी बसपची प्रतिमा कलंकित करण्यासाठी ते सगळे प्रयत्न आहेत व दलितांच्या विरोधात असलेल्या भाजपाने प्रसारमाध्यमांतील एका गटाला व्यवस्थित सांभाळले आहे, असे त्या म्हणाल्या.समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती करण्याचा भाजपा करीत असलेला प्रयत्न रविवारी मी उघड करताच, केवळ नैराश्यातून भाजपाने बसपच्या आणि माझ्या नातेवाईकांच्या विरोधात असल्या क्षुद्र कारवाया सुरू केल्या, असे त्या म्हणाल्या. बँक खात्यात जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब असून, तो पैसा संपूर्ण देशातून पक्ष सदस्य नोंदणीतून गोळा केलेला आहे. दूर अंतरावरच्या भागातून कमी मूल्याच्या एवढ्या नोटांची वाहतूक करणे जिकिरीचे असल्यामुळे त्यांचे रूपांतर मोठ्या मूल्याच्या नोटांमध्ये करण्यात आल्याचेही मायावती म्हणाल्या. परवाना नाही : पासवानसक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईचा संबंध मायावती यांनी त्या स्वत:च्या ‘दलित की बेटी’ असण्याशी लावल्याबद्दल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी टीका केली. मायावती या दलित आहेत, याचा अर्थ भ्रष्टाचार करण्याचा त्यांना परवाना मिळालेला नाही. त्यांनी कायद्यानुसार कारवाईला तोंड दिले पाहिजे. पासवान म्हणाले की, मायावती या दलित, शोषितांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगतात, परंतु अशा पक्षाकडे एवढी प्रचंड रक्कम असणे हे धक्कादायक आहे.
भाजपाकडून बसपची प्रतिमा कलंकित
By admin | Published: December 28, 2016 2:27 AM