नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना शुक्रवारी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. दिल्लीतील निवडून आलेले सरकार पाडण्याचा भाजपचा डाव फसला, असे केजरीवाल म्हणाले. बाबासाहेब झिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या.
'भाजपने 277 आमदार खरेदी केले'केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्लीतील शाळांचे अमेरिकेत कौतुक झाले. बाहेरचे लोक दिल्लीत आल्यावर शाळा पाहतात. दिल्ली सरकारच्या कामाची जगभर चर्चा होते. देशात जर कोणी शिक्षणमंत्री असेल तर ते सिसोदिया आहेत. अशा स्थितीत शिक्षणमंत्र्यांवर दारू घोटाळ्याचे खोटे आरोप झाले. आपच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. भाजपने आतापर्यंत 277 आमदारांना विकत घेतल्याचा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला आहे. यासाठी सुमारे 6300 कोटी रुपये खर्च केल्याचेही केजरीवाल म्हणाले.
'सिसोदिया यांच्या घरातील गाद्या-उशाही फाडल्या''मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने 14 तास छापे टाकले, घरातील गादी-उशी फाडली, पण त्यांच्या हाती एक रुपयाही लागला नाही. छापा टाकण्यासाठी 30-35 लोक आले होते, छाप्यात त्यांच्या खाण्याचे पैसेही निघाले नाही. सीबीआयच्या छाप्याला 7-8 दिवस झाले आहेत, सिसोदिया यांच्या घरातून सीबीआयला काय मिळाले याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. केजरीवाल म्हणाले की, हा संपूर्ण बनावट छापा होता,' असा दावाही त्यांनी केला.