भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांच्या नावाचा समावेश पक्षानं उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत केला आहे. यादरम्यान चौहान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेषत: काँग्रेस समर्थक चौहान यांचा व्हिडीओ सर्वत्र शेअर करत आहेत.
तुम्ही उत्तराखंड निवडणुकीत स्टार प्रचारक आहात. तिथे काय स्थिती आहे, असा सवाल एका व्यक्तीनं शिवराज सिंह चौहान यांना विचारला. त्यावर 'मला तर वाटतं उत्तर प्रदेशात काही शंका नाही. उत्तराखंडमध्येही भाजप आहे. पण थोडी लढत आहे,' असं उत्तर चौहान यांनी दिलं. या व्हिडीओवरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. दोन्ही राज्यांतील भाजपच्या स्थितीवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
तत्पूर्वी मध्य प्रदेशचे परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी काल एक अजब विधान केलं. पाचही राज्यांत काँग्रेसचं सरकार येईल, असं राजपूत म्हणाले. 'पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या प्रयत्नानं राम मंदिराची निर्मिती होत आहे. त्यामुळे उत्तराखंड असो वा गोवा, पंजाब असो वा उत्तर प्रदेश सगळ्या ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळेल. काँग्रेस सत्ता स्थापन करेल,' असं राजपूत बोलून गेले. त्यानंतर त्यांना चूक उमगली आणि त्यांनी भाजप सरकार स्थापन करेल म्हणत चूक सुधारली. राजपूत आधी काँग्रेसमध्ये होते. मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मंत्री झाले.