सुरेश भटेवरा / नवी दिल्लीउत्तर प्रदेशच्या सुलतानपूर मतदारसंघातले भाजपचे खासदार वरूण गांधी भाजपच्या प्रचारापासून पूर्णत: दूर आहेत. त्यांच्या प्रचार करण्यावर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निर्बंध लादले आहेत, की वरूणनी स्वत:च प्रचारापासून दूर रहाणे पसंत केले आहे, ते समजायला मार्ग नाही.एकीकडे उत्तरप्रदेशात १४ वर्षांचा वनवास संपवून राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने सारी शक्ति पणाला लावली आहे तर दुसरीकडे वरूण गांधी ‘आयडिया फॉर न्यू इंडिया अँड नेशन बिल्डिंग’ या विषयावर उत्तर प्रदेश सोडून देशभर भाषणे करीत फिरत आहेत.वरूण गांधींशी दूरध्वनीवर संपर्क साधला, तेव्हा कोची येथील कार्यक्रम आटोपून ते नुकतेच दिल्लीला परतले होते. ‘सध्या मी काय करतो आहे, त्याची माहिती तुम्हाला व्टीटर व फेसबुकवर मिळेल, अन्यथा दोन दिवसांनी फोनवर बोलू,’ असे त्रोटक उत्तर त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिले.वरूण गांधीची पुणे, हैद्राबाद. जम्मू, चुरू व जयपुरमध्ये अलीकडेच भाषणे झाली आहेत. २५ फेब्रुवारीला जोधपूर, ७ मार्चला पंजाब, ९ मार्चला विजयवाडा, १0 मार्चला पुन्हा जयपुर, १७ मार्चला फरीदाबाद, १८ मार्चला जबलपूर, २0 मार्चला भुवनेश्वर, २३ मार्चला उत्तराखंड व २६ मार्चला ते दिल्लीच्या तरूणांना संबोधणार आहेत. एप्रिल महिन्यात बंगलुरू, मंगलोर, पुणे व डेहराडूनला याच मिशनसाठी त्यांचा दौरा आहे.या मतदारसंघासह उत्तरप्रदेशच्या एकाही गावाचा त्यांनी समावेश केलेला नाही.अलाहाबादेत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी पक्षाने वरूण गांधींना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार घोषित करावे अशा मागणीचे अनेक होर्डिंग्ज व पोस्टर्स,त्यांच्या समर्थकांनी बैठक स्थळाच्या आसपास लावले होते. वरूणच्या सभांना उत्तरप्रदेशात तरूणांचा जोरदार प्रतिसाद मिळतो, याचीही पक्षालाही कल्पना आहे. प्रचारमोहिम सुरू होण्यापूर्वी वरूण गांधींचे निकटवर्ती भाजपचे उत्तरप्रदेशातील ५ खासदार अमित शाह यांना भेटले. स्टार प्रचारकांच्या यादीत वरूण गांधींचे नाव नसले तर राज्यात चुकीचा संदेश जाईल. त्यांच्याविषयी आमच्या मतदारसंघात लोकांना विशेष आस्था आहे. जनतेने आम्हाला विचारले तर आम्ही काय उत्तर देणार? असा सवाल शाह यांना केला. अखेर शाह यांनी पक्षाच्या ४0 जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत, ३९ व्या क्रमांकावर वरूण गांधींच्या नावाचा समावेश केला. भार दिग्गज नेत्यांवरतिसऱ्या, चौथ्या व पाचव्या टप्प्यात जिथे मतदान आहे, त्या मतदारसंघात वरूणनी प्रचार करावा, अशी पक्षाची अपेक्षा होती. तथापि अमित शाह आणि वरूण गांधींमधे नेमके काय बिनसले ते समजले नाही. प्रचारमोहिमेपासून वरूणना भाजपने कटाक्षाने दूर ठेवलेले दिसते. पक्षाच्या तिकिटवाटपातही वरूण समर्थक कार्यक र्त्यांना तिकिटे मिळालेली नाहीत. प्रचाराचा सारा भार मुख्यत्वे पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथसिंग, उमा भारती, कलराज मिश्र, केशवप्रसाद मौर्य या सहा सात नेत्यांवरच आहे.
भाजपा प्रचारमोहिमेपासून वरूण गांधी दूर का?
By admin | Published: February 23, 2017 4:09 AM