मुंबई - केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दोन्ही ठिकाणी सत्तेत बरोबरीचा वाटा न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेनेने भाजपाला धक्का देण्यासाठी गुजरातमध्ये उमेदवार उभे केले आहेत. पण शिवसेनेचे राज्यातील मंत्री मात्र सूरतमध्ये जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करत आहेत.
शिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. विजय शिवतारे राज्याचे जलसंवर्धन राज्यमंत्री आहेत. झंखानाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट शिवसेनेचे मंत्री गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चोरयासी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2015 साली चोरयासीचे स्थानिक आमदार राजा पटेल याचे डेंग्युने निधन झाले. त्यानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने झंखाना पटेल यांना उमेदवारी दिली. झंखानानेही विजय मिळवून जागा कायम राखली होती.
देशात अन्य कुठल्याही शहराचा सूरत इतका वेगाने विकास झालेला नाही असे शिवतारे सभेमध्ये म्हणाले होते. मी माझ्या पक्षाच्यावतीने इथे आलेलो नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आलोय. राजाभाई पटेल माझे जवळचे मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही दोघांनी एकत्र घालवला. राजाभाई आणि मी एकाचवेळेस राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जमलेल्या नागरिकांना झखांना पटेलला मतदान करण्याचे आवाहन केले. शिवसेनेने गुजरातमध्ये 47 उमेदवार उभे केले होते. सूरत आणि राजकोटमध्ये शिवसेना उमेदवारांची संख्या जास्त आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये शिवसेनेचे 30 आणि दुस-या टप्प्यात 17 उमेदवार आहेत.