ऑनलाइन लोकमत
रायपूर (छत्तीसगड), दि. २० - काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मतदारांचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रस्त्या-रस्त्यावर फिरणा-या जादुचे खेळ करणा-यांना प्रचारात उतरवलं आहे. विशेषत: मध्य प्रदेश व महाराष्ट्रातले हे रस्त्यावरचे जादुगार हातचलाखीचे खेळ करून प्रेक्षक गोळा करतात आणि नंतर साध्या कापडाचं रुपांतर भाजपाच्या झेंड्यात होताना दिसतं. मग जादुगार सांगतो विकास हवा असेल तर भाजपाला मत द्यायला विसरू नका. अनेक ठिकाणी लोकांना हा पक्षाचा प्रचार आहे माहीत झालेलं असंत. मग, लोकं आधीच विचारतात जादुचा खेळ आहे की निवडणुकीचा प्रचार? आणि मग लोक अपेक्षित उत्तर मिळाल्यावर निघून जातात.
बिश्रामपूरसारख्या ठिकाणी उमेदवार रामचंद्र चंद्रवंशी यांची तयारी पुरेशी झालेली नाही. त्यामुळे संजय खान आणि जमील खान अशा दोघांच्या टीम एकाच मतदारसंघात प्रचारासाठी उतरवण्यात आल्या आहेत. एका जादुगाराला एक सहाय्यक असा संच असून संपूर्ण राज्यात या पद्धतीनं रस्त्या रस्त्यावर प्रचार करण्यात येत आहे. छत्तीसग़डमध्ये काही भागांमध्ये जादुच्या खेळांना सैतानी प्रवृत्ती मानण्यात येते आणि लोकांच्या श्रद्धा दुखावतात. अशा ठिकाणी जादुगार जरासं आवरतं घेतात आणि पुढच्या मार्गाला लागतात.
ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आहे, म्हणजे गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश त्या ठिकाणी राज्य सरकारच्या सहकार्यानं आमचा प्रचार चालतो असं संजय खानचं म्हणणं आहे. अर्थात, लोकांमध्ये जागृती करणं हा आमचा हेतू असल्याचं त्याचं म्हणणं आहे. आम्ही राजकीय नेत्यांशी बोलतो, त्यांना लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे ते समजून घेतो आणि त्यानुसार वेगलेगळ्या जादुच्या ट्रिक्सच्या उपाययोजना करतो. त्यामुळे मग पत्त्याचा खेळ असेल तर मागच्या बाजुला कमळाची चित्र येतात कापड असेल आणि साधं कापड चांगल्या कपड्यामध्ये जादूने बदलत असेल तर भाजपाचा झेंडा होतं आणि विकास हवा असेल तर भाजपाला मत द्या असा संदेश होतो. अनेक ठिकाणी गर्दी उत्साहानं टाळ्या वाजवते, परंतु गोदरनासारख्या मुस्लीमबहुल भागामध्ये मात्र वेगळा अनुभव आल्याचा या जादुगारांचा अनुभव आहे. ज्यावेऴी जादुचा शेवट भाजपाचा झेंडा दिसण्यात होतो त्यावेळी उपस्थित प्रेक्षक एकमेकांकडे बघतात आणि काढता पाय घेतात. कुणी टाळ्या वाजवत नाही की जादुगाराचं कौतुक करत नाही.